वाशिम : बसेस सुरू झाल्याने बसेसमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. परंतु जिल्ह्यातील आगारांमधील अनेक बसेसची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मंगरुळपीर ते अकाेला जाणाऱ्या बसच्या छतातून टपकत असलेले पाणी व खिडकीतून येत असलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना आसन खाली ठेवत उभ्याने प्रवास करण्याची वेळ मंगळवारी दिसून आली.
मंगरुळपीर आगारातील अनेक बसेसची दुरवस्था झालेली आहे. रस्त्याच्या मध्यात बंद पडणे, खिडक्यांना काचा नसणे यासह विविध अडचणी बसेसमध्ये दिसून येत आहेत. मंगळवारी एम.एच. ४० एन. ८१०१ ही मंगरुळपीर ते अकाेला बस निघाली असता यामध्ये बसमधील सर्व आसन खाली व प्रवासी उभ्याने प्रवास करताना दिसून आलेत. काेणीही आसनावर बसत का नाही, याची माहिती जाणून घेतली असता बसचे छत अनेक ठिकाणी पाण्याने टपकताना तर खिडकीमधून पावसाचे पाणी आसनावर पडत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी वाहकास काय ही दशा बसची, असा प्रश्नही केला. यावर मात्र वाहकाने काहीही बाेलण्याचे टाळले. परंतु प्रवाशांनी एसटी महामंडळाबाबत चांगलाच राेष व्यक्त केल्याचे दिसून आले.
------
बसेस दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी
गाेरगरिबांच्या प्रवासासाठी असलेल्या बसमधून प्रवास करताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. अनेक आसने फाटलेले असून खिडक्यांना काचासुद्धा नसल्याने ऊन, वारा, पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन बसेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.