वाशिम: अल्पवयात आणि तडकाफडकी लग्न झाल्याने विवाहाच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या पित्याची इच्छा मुलाने पूर्ण केली. तालुक्यातील सुकळी येथील तुकाराम सखाराम खडसे व त्यांची पत्नी द्रौपदाबाई तुकाराम खडसे या मातापित्याच्या लग्नवाढदिवशीच त्यांचा मुलगा रवि खडसे याने त्यांचा पुनर्विवाह लावून आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवला.
तुकाराम खडसे यांचा विवाह अल्पवयात १९७० मध्ये द्रौपदाबाई यांच्याशी झाला होता. मामाच्या मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमात ते गेले असता आजोबाच्या सांगण्यावरून त्यांचा तडकाफडकी विवाह उरकण्यात आला होता. त्यावेळी तुकाराम खडसे आणि द्रौपदाबाई दोघेही अल्पवयीनच असल्याने आपला विवाह झाला, म्हणजे आपण पती, पत्नी आहोत, असेही त्यांना समजत नव्हते. कळते झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला; परंतु विवाहात नवरदेव म्हणून वावरण्याची त्यांची इच्छा अधुरीच होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा मुलगा रवि खडसे याने पुढाकार घेतला आणि मातापित्याच्या लग्नवाढदिवशी १० जून रोजी त्यांचा नवदाम्पत्यांप्रमाणेच पुनर्विवाह उरकला. यासाठी रितसर आप्तस्वकियांना आमंत्रण देण्यात आले.
मंडप, सजावट करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात नातेवाईकां व्यतीरिक्त ३०० लोकांनी उपस्थिती लावून वधूवरांवर अक्षतांची उधळण केली. या सोहळ्यात गावातील प्रतिष्ठीत परसराम भोयर, राम सावके, रामेश्वर महाले आदिंची उपस्थिती होती.