........................
११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांत समाविष्ट
वाशिम : तालुक्यातील ११० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली असून, ७० जणांची नावे शिधापत्रिकांमधून वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे निरीक्षक नीलेश राठोड यांनी दिली.
.................
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील ध्रुव चौक परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एकबूर्जी जलाशयात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना तांत्रिक कारणांमुळे उद्भवलेली ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी धनंजय गाभणे यांनी नगर परिषदेकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
.....................
रिक्त पदांमुळे कामकाजाचा खोळंबा
वाशिम : जिल्ह्याच्या कृषी विभागात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शेतकरी रवी भुतेकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली.
...................
२०० मीटर अंतराच्या नियमाची पायमल्ली
वाशिम : शहरातील बस स्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत खासगी वाहने उभी राहू नयेत, असा नियम आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाची पायमल्ली केली जात असून, बस स्थानकाच्या जवळच खासगी वाहने उभी करून प्रवाशांची पळवापळवी केला जात आहे.
...................
विपरीत हवामान; हळद पीक संकटात
वाशिम : गेल्या काही दिवसांपूर्वी थंडी वाढली होती आणि सकाळच्या सुमारास धुके पडत होते. आता दिवसभर उन्ह पडत आहे. या विपरीत हवामानाचा फटका हळद पिकाला बसून हे पीक संकटात सापडले आहे. यामुळे सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम जाणवणार असल्याचे शेतकरी रवी मारशेटवार यांनी सांगितले.
.....................
शासकीय कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयांनी किमान थर्मल गनद्वारे येणाऱ्या नागरिकांची तपासणी करायला हवी. असे असताना अनेक कार्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
....................
रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष देण्याचे आवाहन
वाशिम : शहरांमधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुले व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
.....................
युवतींच्या रक्षणासाठी पोलिसांची मोहीम
वाशिम : प्रवास, शिक्षण किंवा इतर कामानिमित्त घराबाहेर राहाव्या लागणाऱ्या युवतींच्या रक्षणासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीदेखील केली जात असल्याचे दिसत आहे.
...................
मार्गदर्शक सूचनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष
वाशिम : राज्य शासनाच्या २९ डिसेंबर २०२० च्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारीपर्यंत लागू करण्यात आल्या आहेत; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असून फिजिकल डिस्टन्सिंग न पाळण्यासह तोंडाला मास्क लावण्याबाबतही नागरिकांनी उदासीनता दाखविली आहे.
.....................
हाय मास्ट लाईट अद्याप बंदच
वाशिम : मालेगाव, शिरपूर, रिसोड, सेनगाव, हिंगोली या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण होऊन काही ठिकाणी हाय मास्ट लाईट लावण्यात आले; मात्र विद्युत जोडणी रखडल्याने हे दिवे अद्याप बंदच असल्याचे दिसत आहे.
......................
सहाशेवर शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड
वाशिम : कृषीविषयक विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रीतसर महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज अपलोड केलेले आहेत. ११ जानेवारी ही अर्ज करण्याची अंतिम मुदत होती, असे सूत्रांनी सांगितले.
..................
नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला
वाशिम : शहरातील श्री शिवाजी विद्यालयापासून आंबेडकर चौकादरम्यानच्या रस्ता नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाहनधारकांची सोय झाली आहे.
......................
संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
वाशिम : लोककल्याणकारी योजनांची माहिती लोककला, पथनाट्यांद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पथकांची निवडसूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संस्थांनी २१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
.....................
वाशिममध्ये ग्राहक दिन साजरा
वाशिम : स्थानिक लाखाळा येथील एका गॅस एजन्सीमध्ये ९ जानेवारी रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या वेळी माणिकराव सोनोने, डॉ. नीता सोनोने, मिलिंद सोनोने उपस्थित होते.
.......................
अफवांमुळे व्यवसाय सापडला संकटात
वाशिम : पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना आजार जडत असल्याच्या अफवा पसरल्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. यामुळे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मोरगव्हाणवाडी येथील गणेश झाडे यांनी दिली. (फोटो - ६)