लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. अंगणवाडी केंद्रांत प्रवेश घेतलेले बालक नियमित येते की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पटपडताळणी केली जाणार आहे. ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे, अर्भक मृत्यू, बालमत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे, बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे, योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे आदी उद्देशातून अंगणवाडी केंद्रांची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांची नोंदणी झालेली आहे. या बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे, आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा देण्याबरोबरच अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. अंगणवाडी केंद्रात नोंदणी झालेली सर्व बालके नियमित येतात की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी पटपडताळणी करण्यात येणार आहे. गर्भवती व स्तनदा मातांना पुरक पोषण आहार व आरोग्य सेवा पुरविली जाते. ११ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र किशोरवयीन मुलींनादेखील पोषण व आरोग्य शिक्षण, अनौपचारिक शिक्षण व पूरक पोषण आहार पुरविला जातो. अंगणवाडी केंद्रातील पात्र लाभार्थींपर्यंत शासकीय योजना पोहचविणे आणि बोगस लाभार्थींना आळा घालण्यासाठी पटपडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना पटपडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खात्री केल्यानंतरच शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
अंगणवाडी केंद्रांतील बालकांची पटपडताळणी करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना दिलेल्या आहेत. शासकीय योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविणे, पोषण आहार वाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणणे यासाठी पटपडताळणी केली जाणार आहे.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.