- संतोष वानखडे वाशिम -तुषार सैनिक ॲकॅडमी मोप (ता.रिसोड) यांच्यावतीने मोप येथे १२ फेब्रुवारी रोजी आयोजित खुली दौड (मॅराथाॅन) स्पर्धेसाठी दूरवरून स्पर्धक आले. परंतू, स्पर्धाच झाली नसल्याने संतप्त झालेल्या स्पर्धकांनी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली.
तुषार सैनिक ॲकॅडमी मोपद्वारा खुली दौड स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धकांसाठी ५० हजार रुपये बक्षिसांची लयलूट असून, प्रवेश फी १०० रुपये ठेवण्यात आली होती. वाशिमसह पुणे, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, जालना, अकोला जिल्ह्यातील जवळपास ९९७ पेक्षा अधिक स्पर्धकांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फीचा भरणा केला. रविवारी (दि.१२) सकाळीच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरवरून स्पर्धक मोप येथे आले होते. मात्र या ठिकाणी स्पर्धेचे कुठलंच नियोजन नव्हते. त्यामुळे गोंधळ उडाला.
याबाबत रिसोड पोलीस स्टेशनला फोन करून कळवण्यात आले. मात्र स्पर्धेचे आयोजक व पंचकमिटी यापैकी कोणीच हजर नसल्याने या स्पर्धकांनी आयोजक पारवे यांच्या बस स्टॅन्ड नजीक असलेल्या घरासमोर राडा करून रास्ता रोको आंदोलन केले. रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्पर्धकांचे म्हणणे ऐकून घेतले. पुढील चौकशी व तपास रिसोड पोलिस करीत आहेत.