लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील अंगणवाडी केंद्रातील ८८६८८ पैकी ६९६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरित १९ हजार बालके आधारविना आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून ‘लॉकडाऊन’ असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आधार नोंदणीवर निर्बंध आल्याने अंगणवाडीतील १९ हजार बालकांची आधार नोंदणीही लांबणीवर पडली.जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालकांची नोंदणी झालेली आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी आवश्यक आहे. अपरिहार्य कारणांमुळे जेथे आधार नोंदणी होऊ शकली नाही, तेथे आॅफलाईन पद्धतीने पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्याची सूटही महिला व बालकल्याण विभागाने दिलेली आहे. जिल्ह्यातील ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरित १९ हजार बालके आधारविना आहेत. या बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅब दिले. एका पर्यवेक्षिकेकडे साधारणत: २५ ते ३० अंगणवाडी केंद्रांची जबाबदारी असते. जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले असून, पर्यवेक्षिकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आधार नोंदणीवरही नियंत्रण आल्याने बालकांची आधार नोंदणी ठप्प पडली.
आधार नोंदणी मशिन जमा केल्याआधार नोंदणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब व थम् मशिन मिळाल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत आधार नोंदणी बंद केली. आधार नोंदणीसाठी महिला व बालकल्याण विभागाला मिळालेल्या थम मशिन लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या.