ऑनलाइन लोकमत
वाशिम : स्थानिक श्रावस्ती नगरातील निवासस्थानाजवळून गेलेली उच्च दाबाच्या वीज वाहिणीची तार अन्यत्र हलविण्यात येण्याच्या मागणीसाठी चिमुकल्यांनी गुरूवारी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जनता दरबारात संवाद साधला. यावेळी एका महिन्यात हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले.
स्थानिक श्रावस्ती नगरातील पुंडलिक देवढे यांच्या मालकीच्या घराच्या अगदी जवळून ११ केव्ही विद्युत वाहिनीची तार सिव्हील लाईनस्थित श्रावस्तीनगर - वाटाणे ले आउटमधून गेलेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारेमुळे वारंवार शॉटसर्किट होवून स्पार्किंग होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे घराला आग लागण्याची किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात पार्किंग होत असल्याचा प्रकार संबंधित विभागाच्या निदर्शनात वारंवार आणून दिला. मात्र, अजूनही काहीच कार्यवाही नाही. यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला तसेच आमदार अमित झनक यांनी अभियंत्यांना सूचनाही केल्या. मात्र, प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून गुरूवारी श्रावस्ती नगरातील नागरिकांसह चिमुकल्यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना निवेदन देत हकिकत कथन केली. यावर एका महिन्याच्या आत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले.