लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): ‘पॉप’सारख्या चिनी बनावटीच्या फटाक्यांना बंदी असताना देखील या फटाक्यांची विक्री सद्या सर्रास सुरु असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, सुरू असलेली फटाक्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी सद्या जोर धरत आहे. चिनी बनावटीच्या फटाक्यांमध्ये ‘पोट्याशियम परक्लोरेट’ची मात्रा खूप अधिक प्रमाणात असते. यामुळे वायू प्रदुषण होण्यासोबत जनजीवन धोक्यात सापडू शकते. त्यामुळे अशा फटाक्यांना बंदी घालण्यात आली होती. असे असताना मालेगावच्या फटाका मार्केटमध्ये बंदी असलेले फटाकेही बिनदिक्कत विकले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
‘पॉप’ फटाक्याची विशेषता सद्या फटाका बाजारात चिनी पॉप हा सर्वाधिक विक्री होणारा फटाका असून कागदामध्ये गुंडाळलेला हा फटाका जोरात खाली आदळल्यास त्याचा मोठा आवाज होता आणि मोठ्या प्रमाणात अग्निज्वाळा बाहेर निघतात. काही फटाके तर बॉम्ब अथवा हॅण्ड ग्रेनेडसारखे असून त्यात हलक्या प्रतिची बारूद वापरल्या जात असल्याने ते तुलनेने स्वस्त आहेत.
कुठलेही फटाके शरिरासाठी हानिकारकच आहेत. त्यातच चिनी बनावटीचे फटाके तर फारच घातक ठरतात. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते आणि ते अंधत्व येण्यास कारणीभूत ठरू शकते. काही मुले फटाके हातात फोडतात. त्यामुळे हात निकामी होण्याची शक्यता अधिक असते. - डॉ पवन मानधने, मालेगांव