पावसाच्या दिवसात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर, सापांच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून-ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती, शेती पिकात वावरत असतात. भारतात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी जिल्ह्यात केवळ चार जातीचे विषारी साप आढळतात. ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशिवारात संचार वाढला आहे. सद्यस्थितीत पिके चांगली वाढली आहेत. शेतकरी पिकांत फवारणी करण्यासह निंदण, खुरपणाची कामे करीत असून, सापांमुळे असलेला धोका लक्षात घेत, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन निसर्ग स्पर्श फाउंडेशन प्रणित वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन टीमचे सदस्य तथा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे आणि त्यांच्या सहकारी सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे.
----------
शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी
१) शेतात फिरताना, फवारणी करताना लांब जाड बुटांचा वापर करावा.
२) शक्यतो, यंत्राद्वारेच फवारणी करावी.
३) पिकांत फिरताना जाड काठी, बूट आदळत जावे.
४) हाताने पिकांची पाहणी करू नये, पिकांत खाली वाकू नये.
५) साप दिसल्यास त्याला न डिवचता सर्पमित्राला कळवावे.
६) जून ते ऑगस्टच्या दरम्यान सर्वाधिक सतर्कता बाळगावी.
----------------
जिल्ह्यात केवळ चारच प्रमुख विषारी साप
भारतात सापांच्या विविध प्रकारच्या असंख्य जाती आढळून येत असल्या, तरी देशभरात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी केवळ चारच प्रमुख विषारी साप वाशिम जिल्ह्यात आढळून येतात. त्यात मण्यार, घोणस, फुरसे आणि नाग या सापांचा समावेश आहे, त्याशिवाय जिल्ह्यात पाच ते सहा प्रकारचे निमविषारी साप आढळून येतात. त्यामुळे सरसकट सर्वच साप विषारी समजणे चुकीचे आहे.
---------
कोट : सततच्या पावसामुळे बिळात पाणी शिरल्याने सापांचा जमिनीवर, शिवारात संचार वाढतो. प्रामुख्याने उंच वाढलेल्या पिकांत खाद्य शोधण्यासाठी साप फिरतात. सापाला ऐकू येत नाही. जमिनीच्या कंपनावरून तो अंदाज लावतो. त्यामुळे पाय आदळत फिरल्यास साप असल्याचे कळू शकते. शेतकऱ्यांनी सहसा लांब बूट घालूनच पिकांत फवारणी किंवा पाहणी करावी.
- गौरवकुमार इंगळे, मानद वन्यजीवरक्षक, तथा सर्पमित्र.