शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना शासकीय रुग्णालयात मोफत कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे. या लसीकरणाला प्रतिसाद वाढविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी नागरिकांना ही लस घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लस उपलब्ध असून या दोन्ही लसी पूर्णत: सुरक्षित असून त्यांचा कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार पेक्षा अधिक नागरिकांनी ही लस घेतली आहे. यापैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी सांगितले आहे. दरम्यान, या लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद लाभत असून, २ दिवसांत १२४३ व्यक्तींनी ही लस घेतली आहे.
---------------
जिल्ह्यात लसींचा मुबलक साठा
जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ४ हजार ०२२ डोस उपलब्ध आहेत, तसेच कोव्हॅक्सीन लसीचे सुमारे २० हजार डोस उपलब्ध आहेत. त्यात २ एप्रिल रोजी कोविशिल्ड लसीचे आणखी २० हजार डोस उपलब्ध करण्यात आले असून, यापुढेही नियमितपणे लसीचा पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली.