वाशिम : पोस्ट कोविडनंतर जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसचे (बुरशीजन्य आजार) काही रुग्ण आढळून येत असून, ११ मे रोजी एका ६२ वर्षीय महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे ठरत आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येताच वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.
कोविड आजारातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूंमुळे होतो. लवकर निदान झाले तर या आजारावर सहज मात करता येते. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांनी डोळा, दात, मुख, तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे आदी लक्षणे आढळून येताच संबंधित रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरत आहे. ११ मे रोजी मोप येथील महिलेच्या डोळ्याला अचानक सूज आली. संबंधित डॉक्टरांनी तपासणी करून ‘म्युकरमायकोसिस’ असल्याचे निदान केले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनही अलर्ट झाले. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी ही महिला ठरली असल्याने नागरिकांनी आतातरी सावध राहणे गरजेचे आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर मुख, डोळा, दाताशी संबंधित कोणताही आजार उद्भवला, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच निदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
बॉक्स
प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना धोका
ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेली असेल, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल, तर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. विषाणू संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून पुढचे कमीत कमी दोन ते तीन महिने हा धोका राहू शकतो. त्यामुळे मुख, डोळा, दात यासंबंधी कोणताही आजार, लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले.