वाशिम : शहरात दुकानांवर हाेत असलेली गर्दी व रस्त्यात वाहने उभी करून तास न तास गायब राहणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूक विस्कळीत हाेत असल्याच्या प्रकारात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून, अतिशय त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
वाशिम शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे नेहमीच माेठया प्रमाणात गर्दी राहाते. काेराेना संसर्ग पाहता गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, याकरिता पाेलीस विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. तरीसुध्दा काही नागरिक आपली वाहने चक्क रस्त्यात उभी करून तास न तास गायब राहात असल्याने नागरिकांना या बेताल वाहतुकीचा सामना करताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतीने चालू वर्षात अस्ताव्यस्त वाहतूक करणाऱ्यांसह नाे पार्किंग झाेनमध्ये वाहन ठेवणाऱ्यांकडून ३.६१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीसुध्दा हा प्रकार सर्रास दिसून येत आहे.
.................
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शहरात अस्ताव्यस्त वाहने चालविणाऱ्यांसह वाहन चालवतांना काेणत्याच नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- नागेश मोहोड, शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम
..............
नाे पार्किंगमध्ये गाड्या ठेवणाऱ्यांना शहर वाहतूक शाखेतर्फे ३.६९ रुपयांचा दंड
शहरात बेशिस्त वाहने चालवून नागरिकांची डाेकेदुखी ठरणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तरीसुध्दा अनेक जण नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. याकरिता पाेलीस निरीक्षक नागरेश माेहाेड यांनी शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रत्येक चाैकात पाेलीस शिपाई बसवून ठेवले आहेत.