यशवंत हिवराळे
राजुरा : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात सध्या स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना एक कि.मी.अंतरावरून घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.
खैरखेडा गावात पाणीटंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टॅंकर हे जणू गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून समीकरण बनले आहे. आदिवासी व बंजारा समाज बहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावाचा संपूर्ण भूभाग खडकाळ डोंगरदऱ्या व कडा कपारींनी वेढलेला आहे. गावात पाचशे फुटावर कूपनलिका घेऊनही त्याला पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नसल्याने या गावात सार्वजनिक तथा खासगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पानवठा नाही. गावात एकही हातपंप वा पानवठा नसलेलं बहुदा हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील जनतेची तहान दूषित पाण्यावर भागविली जाते. बरेचदा नदीपात्रातील ज्या डोहावर कुत्रे, गुरे पाणी पितात, त्याच डोहानजीक झिरी खोदून त्यातील दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे वास्तव आहे. महिलांनाही धुणे धुण्यासाठी गाव परिसरातील दोन कि.मी.अंतरावरील नदी पात्रातील डोहावर पायपीट करून भर उन्हात जाव लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. उपाययोजना शून्य असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
........
जलस्वराज्य योजना कुचकामी
सात वर्षांपूर्वी शासनाने करोडो रुपये खर्च करून गावासाठी जलस्वराज्य योजनेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र या योजनेतून पाणीपुरवठा करणारा जलस्त्रोतच पाणीपुरवठा करण्यात निकामी ठरल्याने करोडो रुपये खर्च करून राबविण्यात आलेली ही योजनाही कुचकामी ठरली आहे. परिणामी आबालवृद्धांना भर उन्हात पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत आहे. शासन तथा लोकप्रतिनिधींनी गावासाठी डव्हा नजीकच्या चाकातीर्थ संग्राहक तलाव अथवा सुदी येथील तलावावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून ग्रामस्थांची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.
........
बॉक्स-
खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत महिला, पुरुषांना एक कि.मी. अंतरावरून घाट रस्ता चढून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. येथील समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे.
निवास राठोड
ग्रा. प. सदस्य खैरखेडा