वाशिम - स्थानिक नगर परिषदेने नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचा कांगावा केला जातोय की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्यक्षात मात्र शहरवासीयांना नळाद्वारे पुरवण्यात येणारे गढुळ, मातीमिश्रित आणि दुषित असे आहे. गुरूवारी (22 फेब्रुवारी ) पुन्हा ही बाब अधोरेखीत झाली.
यादिवशी नळाला आलेले पाणी चक्क फेसाळलेले तसंच पिण्यास योग्य नसल्याचंही दिसून आले. ही बाब ध्रुव चौक भागात वास्तव्याला असलेले संदीप कुंडलिक चिखलकर यांच्यासह इतर काही युवकांनी नगर परिषद गाठून हा प्रकार संबंधितांच्या निदर्शनास आणून दिला.वाशिम शहराला नजिकच्या एकबूर्जी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत तीन ते चार ठिकाणी मोठ्या स्वरूपातील जलकुंभ उभारण्यात आले. नागरिकांना नवीन नळ कनेक्शनही देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुद्ध पाणीपुरवठा केले जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र, असे न होता आजही दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.
गुरूवारी शहरातील ध्रुव चौक भागात नळाव्दारे आलेले पाणी पूर्णत: फेसाळलेले होते. या दुषित पाण्याचे नागरिकांनी व्हिडीओ काढून पुरावा म्हणून नगर परिषदेच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. किमान यापुढे तरी शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.