लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - ट्रकने शाळकरी विद्यार्थीनीस चिरडल्याची घटना कारंजा शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चौकात १ आॅक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. आरती मनोज मोघाड असे मृतक मुलीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार एम पी ०९, १७५७ क्रमांकाचा ट्रक मुर्तिजापूरहून दारव्हाकडे जात असतांना ट्रकसमोर असणाºया सायकलला ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सायकलवरील मुलगी आरती मोघाड ही चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शिक्षक मनोज मोघाड यांची ती कन्या होती. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे शाम सवाई यांनी रूग्णवाहिका व आपल्या चमूसहित घटनास्थळ गाठले व त्या शाळकरी विद्यार्थीनीस कारंजा उपजिल्हा रूग्णालयास आणले. परंतु त्यापुर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. आरती ही कारंजा येथील कंकुबाई कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. १ आॅक्टोंबर रोजी ती तालुका क्रिडा संकुल मार्गावरून आपल्या घरी बालाजी नगरीत जात असताना ही दुदैर्वी घटना घडली. दरम्यान घटनेची तिव्रता पाहून पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन सदर घटनेसंदर्भात कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. अपघाती घटनांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी श्याम सवाई यांनी केली. शिक्षक संघटनेच्या आक्रमतेनंतर अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेऊन चालकाचा शोध सुरू केला असून, वृत्त लिहिस्तोवर चालकाचा शोध लागला नव्हता. बायपास परिसरात गतिरोधक बसविण्यासाठी पोलिसांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागास पत्र देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी ठाणेदार जाधव यांनी उपस्थित शिक्षकांना दिले. दरम्यान मृतक विद्यार्थीनीचे वडिल मनोज मोघाड यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.
कारंजा शहरात भरधाव ट्रकने विद्यार्थीनीस चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:38 PM