संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला असून, कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून संचारबंदी लागू केली आहे; सोबतच संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणाला बाहेर पडता येणार नाही, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरुवारच्या आढावा सभेत दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना, तसे होत नसल्याचे शुक्रवारीदेखील दिसून आले. वाशिम शहरासह मालेगाव, रिसोड, कारंजा, मानोरा मंगरूळपीर शहरातील बाजारपेठेत व रस्त्यांवरही नागरिकांची वर्दळ दिसून आली. वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर दुपारच्या सुमारास गर्दी होत असल्याने येथे पोलीस बंदोबस्त वाढविणे गरजेचे ठरत आहे.
दुसऱ्या दिवशीही नागरिक रस्त्यांवर; प्रशासन हतबल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:39 AM