वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील ग्रामसभेत २० नोव्हेंबर रोजी दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास दोन्ही गटातील १२ आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
फिर्यादी रजनीश सुरेशचंद्र कर्नावट (५२) रा. शेलुबाजार यांच्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजताचे सुमारास ग्राम पंचायत शेलुबाजार येथे आरोपी पवन गुप्ता (३२), विक्की आनंदकुमार गुप्ता (३५), विश्वजीत गुप्ता (२७), राहुल बंसीलाल गुप्ता (२६), गौरव नवरंग गुप्ता (२७), तुषार गुप्ता (२६), जयकुमार गुप्ता अधिक दोन सर्व रा. शेलुबाजार यांनी ग्रामसभेदरम्यान संगणमत करून व गैर कायद्याची मंडळी जमवुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवाने मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १४३, १४७, १४९, २९४, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटातील फिर्यादी विक्की आनंदप्रसाद गुप्ता (३५) यांच्या तक्रारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान ग्राम पंचायत शेलुबाजार येथे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीबाबत आयोजित ग्रामसभेला अनेकांची उपस्थिती होती. तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभा अध्यक्ष निवडण्याकरीता नियमानुसार ग्राम सचिव विलास गव्हाणे यांनी हात वर करून सभाध्यक्ष यांची निवड करावी असे सांगितले.
सभेतील लोकांनी हात उंचावून श्रीराम पवार यांची बहुमताने निवड केली असता, रजनीश सुरेशचंद्र कर्नावट यांनी हरकत घेवून गोपनीय पद्धतीने मतदान करा असे म्हणुन सभेमध्ये वाद निर्माण केला. त्यावेळी फिर्यादीचे भाउ जय गुप्ता हे त्यांना समजाविण्याकरीता गेले असता रजनीष सुरेशचंद्र कर्नावट यांनी जय गुप्ता यांना शिवीगाळ करून धमकी दिली तसेच समजविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व पवन गुप्ता यांनाही शिविगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी ग्रामसभेमध्ये असलेले मनिश सुरेशचंद्र कर्नावट, पियुश रजनिश कर्नावट, मोहीत अनिश कर्नावट सर्व रा. शेलुबाजार हे तेथे आले व त्यांनी सभेमध्ये गदारोळ घालुन जय गुप्ता, पवन गुप्ता, व फिर्यादीला धक्काबुक्की व शीवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलीसांनी आरोपींवर कलम ३२३ ,३२४, २९४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.