लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले असून, २६ जूनपासून या नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यासाठी २६ जून रोजी प्रत्येक शाळेत पालक प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकांनी बैठक घ्यावी, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला दिलेले आहे. त्यानुसार कोरोनामुक्त क्षेत्रातील शाळांमध्ये नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग २६ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. नववी, दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, सुरक्षितता, किती सत्रात वर्ग घ्यावयाचे याचा निर्णय शिक्षण विभागाने स्थानिक शाळा प्रशासन व शालेय व्यवस्थापन समितीवर सोपविला आहे. दहाव्या वर्गाचा निकाल जाहिर झाल्यानंतर अकरावीचे वर्गही याच पद्धतीने सुरू करण्याचे नियोजन आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित परिसरात एक महिना कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत, असे शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.
बैठकीत होणार आॅनलाईन शिक्षणाचा निर्णयजिल्हा परिषदेच्या शाळा तसेच खासगी शाळांतील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत चर्चा व्हावी याकरीता शाळा व्यवस्थापन समिती, शाळा प्रशासन, शिक्षक व मुख्याध्यापकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रत्येक शाळेत २६ जून रोेजी बैठक घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो, त्यानुसार आॅनलाईन शिक्षण पद्धतीचे भवितव्य ठरणार आहे.
कोरोनामुक्त असलेल्या परिसरातील शाळांमध्ये नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग २६ जूनपासून सुरू केले जाणार आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात २६ जूनला प्रत्येक शाळेत बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. - अंबादास मानकर,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम