00
दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : गत दोन दिवसांत दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून नागरिक व दुकानदारांनी दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
00
फवारणी करण्याची मागणी
वाशिम : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे गरजेचे आहे. याकडे ग्रामपंचायतींनी तसेच प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
000
वीजबिल माफ करण्याची मागणी
वाशिम : कोरोनाकाळात गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक लोकांना रोजगार नव्हता. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर या काळातील वीज देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी महावितरणकडे केली.
000
अनुदानाअभावी रखडली घरकुले
वाशिम : चिखली परिसरात अनुसूचित जातीमधील नऊ लाभार्थींना रमाई घरकूल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले; परंतु सात महिने उलटत आले तरी या लाभार्थींच्या खात्यात घरकूल अनुदानाचा निधी जमा करण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थींच्या घरकुलांचे कामे रखडली आहे.
00
कोरोनाबाबत गावात जनजागृती
वाशिम : काजळेश्वर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक प्रमाणात पसरू नये म्हणून काजळेश्वर आयुर्वेदिक दवाखाना तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सतत धडपड करीत आहेत. यात गत तीन दिवसात आरोग्य पथकाने गावात फिरून जनजागृती केली.
00
घोटा येथे आरोग्य तपासणी मोहीम
वाशिम : रिसोड तालुक्यातील घोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने सतर्क होत नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशी लक्षणे असणाऱ्यांची चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
000
आशासेविकांना सुरक्षा किट द्याव्यात
वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आशासेविका तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांना सुरक्षा किट नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण असून, सुरक्षा किट पुरविण्याची त्यांची मागणी आहे.
000
घरोघर फिरून ग्रामस्थांची तपासणी
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर दिला जात आहे. या अंतर्गत आठवडाभरापासून केनवड आरोग्यवर्धिनी केंद्राचे पथक गावात फिरून लोकांची तपासणी करीत आहे.
00
शेतकरी चेतना केंद्राची मागणी
वाशिम : गावस्तरावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच योग्य शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे, सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून शासनाकडून शेतकरी चेतना केंद्राची स्थापना केली जात आहे. असे केंद्र मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथेही व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
000
चिखलीमार्गे रिसोड-अकोला बसफेरी बंद
रिसोड : चिखली, कवठामार्गे सुरू असलेली रिसोड-अकोला ही बसफेरी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाशिममार्गे अकोला जाण्याची वेळ आली आहे. चिखलीमार्गे अकोला बसफेरी सुरू करण्याची मागणी कवठा येथील नंदकिशोर शर्मा यांनी बुधवारी केली.
00
संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी
वाशिम : रिठद गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासंदर्भात तालुका प्रशासनामार्फत यापूर्वी मागणी करण्यात आली. अद्याप शासनाकडून निधी मिळाला नाही. पूर संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी सोमवारी तालुका प्रशासनाकडे केली.
00
तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडला
वाशिम : क्रीडाप्रेमी युवकांना मैदानी खेळांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाप्रमाणेच तालुका क्रीडा संकुलही उभारले जावे, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली; मात्र हा प्रश्न अद्यापपर्यंत निकाली निघालेला नाही.
0000
शाळांमधील सुविधांकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष
वाशिम : १४ व १५व्या वित्त आयोगातून विकासविषयक कामांसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख घटकांवर एकूण खर्चाच्या २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, वाशिम तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च करण्याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.