वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायती हागणदरीमूक्त झाल्या असून, येत्या महिनाभरात उर्वरित ६ ग्रामपंचायती हागणदरीमूक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षासह पंचायत समिती प्रशासनाची धडपड सुरू आहे.
जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम हे तालुके हागणदरीमूक्त घोषीत करण्यात आले असून, उर्वरित मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात हागणदरीमुक्तीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत मंगरुळपीर तालुक्यावर स्वच्च्छता मिशन कक्षाचे लक्ष केंद्रीत आहे. या अंतर्गत निर्धारित उद्दिष्टानुसार तालुक्यातील ६६ ग्रामपंचायती हागणदरीमूक्त झाल्या आहेत. आता येत्या २० दिवसांत उर्वरित ६ ग्रामपंचायती हागणदरीमूक्त करून तालुका हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या मार्गदर्शनात जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाºयांसह पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. यासाठी गृहभेटी अभियान राबवून ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासह सुरू असलेल्या शौचालयांच्या कामाची पाहणी करण्यात येत आहे. त्याशिवाय गावागावांत गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके फिरवून हागणदरीमुक्तीचे सातत्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.