लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्यातर्फे तालुकास्तरीय कार्यशाळा घेऊन स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसंदर्भात माहिती दिली जात आहे. वाशिम तालुका पाठोपाठ मंगरूळपीर येथेही कार्यशाळा घेण्यात आली.गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसºया टप्प्यातील ‘ओडीएफ’ टप्पा - २ अंतर्गत (हगणदरीमुक्त ग्राम पंचायत) पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या निर्दशानुसार तालुकास्तरीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत. वाशिम येथे कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुख व अधिकाºयांची कार्यशाळा घेतल्यानंतर वाशिम पंचायत समिती आणि आता ४ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पंचायत समिती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे आणि गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राम श्रृंगारे आणि मुल्यांकन व सनियंत्रण सल्लागार विजय नागे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना गाव स्तरावर कशाप्रकारे पडताळणी करायची, स्वच्छता अॅपवर अधिकाधिक प्रतिक्रिया कशा नोंदवायच्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छता अॅपवर उपस्थितांकडून अभिप्राय देखील नोंदवून घेण्यात आले. रिसोड, मालेगाव, मानोरा, कारंजा या तालुक्यातही जनजागृती केली जात आहे.
तालुकास्तरीय कार्यशाळेतून स्वच्छ सर्वेक्षणाचा जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:31 PM