शिरपूर जैन: येथील ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे बांधकाम गेल्या २० वर्षांपासून अर्धवटच होते. त्यामुळे पडगळीस आलेल्या कार्यालयातूनच ग्रामपंचायतचा कारभार चालत होता. आता १५ व्या वित्त आयोगातून या कामासाठी तरतूद झाल्याने लवकरच हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर येथे ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम २००० ते २००५ दरम्यान सुरू करण्यात आले होते. तथापि, त्यावेळी निधीची कमतरता भासल्याने हे बांधकाम रखडले आहे. त्यानंतर सन २००५ मध्ये तत्कालीन ग्रामसेवकाचे निधन झाले. त्यामुळे इमारत बांधकामाशी संबंधित असलेली कागदपत्रे अद्यापही ग्रामपंचायतीला उपलब्ध होऊ शकले नाहीत. सद्यस्थितीत ठेकेदार ग्रामपंचायतीकडे बांधकामाचे देयक थकीत असल्याचे सांगत आहे, तर ग्रामपंचायतीकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने काय खरे, काय खोटे, हे समजणे अवघड झाले आहे. ठेकेदार व ग्रामपंचायत या प्रकरणी न्यायालयात गेले असून, या प्रकरणाचा निकाल काय लागतो. याकडे गावातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून १७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सदर ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यास गावकऱ्यांसाठी सोयीचे ठरणार आहे. सद्यस्थितीत बसस्थानक परिसरात असलेल्या ग्रामपंचायतीत विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता इमारत अतिशय तोकडी पडत आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून इमारतीचे बांधकाम, तर अर्धवट अवस्थेत आहेच. केलेले कामही क्षतिग्रस्त झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी १५ व्या वित्त आयोगातून १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
-भागवत भुरकाडे ग्रामसचिव, ग्रामपंचायत शिरपूर जैन.