लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हिवाळ्याला सुरूवात झाली असून, वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला यासह साथरोग बळावत असल्याचे दिसून येते. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी होत आहे.जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, ५ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील किमान तापमान १६.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वातावरणातील बदलाचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. गत आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हवेत गारवा भरला आहे. वातावरणात गारवा जाणवत असल्याने, ग्रामीण भागात शेकोट्या पेटत आहे. दरम्यान वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: लहाने मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना थंडीमुळे सर्दी व खोकला अशी लक्षणे आढळून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनीदेखील आवश्यक ती काळजी घ्यावी. - डाॅ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वाशिम