भर जहागीर - अनलाॅकनंतर ही रिसोड तालुक्यातील चिंचाबाभर, मोहजाबंदी, लोणी ,मोप भागातील जिल्हा सीमा बंदच होत्या, यावर लोकमतने ९ जूनला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘अनलाॅक’मध्ये ही ग्रामीण भागातील रस्ते बंदच.. ! या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची तहसीलदार अजित शेलार, पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी दखल घेत दुपारी बारा वाजेपर्यंत चारही रस्त्यावरील सीमा हटवून रस्ते मोकळे केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले हाेते. काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याचे पाहून प्रशासनाने अनलाॅक केले. परंतु तालुक्यातील साखरा, केलसुला,कापडसिंगी, सावरगाव,रायगाव, गांधारी, सोनुना, शिवणी, वढव हिरडव, आरडव, दाभा, पहूर सह आदी गावांची बाजारपेठ त्यांच्या स्व जिल्ह्यापेक्षा रिसोड बाजारपेठ जवळ असल्याने या गावातील नागरिकांचे सर्व व्यवहार रिसोडमध्ये होत होते. परंतु या गावाकडून येणारे सीमेवरील रस्ते अनलाॅकमध्ये ही बंद असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत होती. याची दखल घेत वृत्त प्रकाशित करताच अवघ्या सहा तासात वरील गावांच्या सीमेवरील रस्ते मोकळे करण्यासाठी तालुका प्रशासनाने पुढाकार घेतला.
सदर प्रकार हा लोकमतच्या वृत्ताने निदर्शनास येताच तालुक्यातील सीमावर्ती भागातील रस्ते मोकळे करण्यात आले.
अजित शेलार, तहसीलदार, रिसाेड
माझ्या बीट मधील मोहजाबंदी,लोणी,मोप येथील रस्ते अनलाॅकमध्ये बंदची माहिती लोकमत मधील वृत्ताने समजताच तत्काळ मोहजाबंदी,लोणी येथील रस्ते मोकळे करण्यात आले.
संताेष नेमणार, पाेलीस उपनिरीक्षक