विवरा (जि. अकोला): येथील एका जुन्या वाड्यात १0 ते १५ दिवसांपासून घरातील कपाटातून अचानक साड्यांच्या कपड्यापासून बनविलेल्या व डोक्याच्या जागी लिंबू बसविलेल्या बाहुल्या निघत असल्याचा व घरात कुठेही जमिनीवर घरातील एका सदस्याचे नाव पिठाने लिहून त्यावर फुली मारण्याचा प्रकार घडत असल्याने घरातील लोक व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या प्रकारामुळे ३ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व पोलिसांना बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. विवरा येथील प्रवीण माधवराव देशमुख यांच्या घरात हा प्रकार सातत्याने घडत आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून साडीच्या कपड्याची बनविलेली व डोक्याच्या जागी लिंबू बसविलेली लहानशी बाहुली निघाली. तसेच त्यांच्या घरातील स्नानगृहात जमिनीवर पिठाने कुटुंबप्रमुख प्रवीण देशमुख यांचे नाव लिहून त्यावर पिठानेच फुली मारली होती. या प्रकारामुळे विवरा येथील ग्रामस्थांनी चान्नीचे ठाणेदार विष्णू गुट्टे यांना याबाबत कळविले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोला जिल्हा संघटक डॉ.गजानन पारधी यांनाही कळविले. त्यानुसार अंनिसचे डॉ.पारधी, कार्यकर्ते शिवाजी भोसले, गजानन चोपडे यांनी रात्री १0 वाजताच्या सुमारास विवरा गावात जाऊन प्रवीण देशमुख यांच्या घरातील प्रकार पाहिला. या सातत्याने घडणार्या प्रकारामुळे प्रवीण देशमुख व त्यांच्या घरातील लोक कमालीचे धास्तावलेले आहेत. हा प्रकार थांबवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तेथील लोकांशी चर्चा केली. ग्रामस्थांशीदेखील चर्चा केली. त्यांनी हा प्रकार थांबविण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा सारा प्रकार कुणीतरी खोडसाळपणे घडवित असून, त्यामागे प्रवीण देशमुख यांना घाबरवून सोडण्याचा डाव असल्याचे दिसून येते. या प्रकारामागे त्यांच्या जवळचीच कुणीतरी व्यक्ती असावी, असे जाणवते. या प्रकाराचा पाठपुरावा ठाणेदार गुट्टे यांच्या सोबतच आम्ही करणार आहोत. देशमुख यांच्या घरातील लोकांचा इतिहास जाणून घेऊन हा प्रकार कोण घडविते ते उघडकीस आणणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ.गजानन पारधी यांनी सांगीतले.
कपाटातून निघतात कपड्याच्या बाहुल्या, तर जमिनीवर लिहिले जाते पिठाने नाव
By admin | Published: September 04, 2015 1:37 AM