सुनील काकडेवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव शहरात मुख्य रस्त्यावरील कापड दुकानास १० ऑगस्ट रोजी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत रेडीमेड कपड्यांसह ७८ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य अवलंबिले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिव चौकातील तिर्थराज रेडीमेड या कापड दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास धूर येत असल्याचे बाजूला असलेल्या दवाखान्यातील कंपाउंडरच्या लक्षात आले. त्याने याबाबत दुकान मालकास फोनव्दारे माहिती दिली. दुकान मालक येईस्तोवर आगीने उग्ररूप धारण केले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिस कर्मचारही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. काहीच क्षणात मालेगाव नगर पंचायत व वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या घटनेत दुकानातील सुमारे ७२ लाख रुपये किंमतीचे रेडीमेड कपडे, लाकडी फर्निचर, इलेक्ट्रिक व काचेच्या साहित्यांसह ७८ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.