वाशिम : गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.
यावर्षी वातावरणात बदल जाणवत आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही वातावरणात बदल झाल्याने साथरोग बळावले होते. मार्च महिन्यात साधारणत: दुसऱ्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी आजार जडत असल्याचे दिसून येते. वातावरणातील बदलाची सर्वाधिक झळ लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात गत तीन-चार दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले.
सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण, दुपारी तापते ऊन आणि सायंकाळनंतर कधी उकाडा तर कधी गारवा यामुळे आरोेग्य बिघडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. साधारणत: मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरकारी रुग्णालयांत रूग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बाहेरील अन्न-पदार्थ खाण्याचे टाळावे तसेच पाणी शक्यतोवर तापवून घ्यावे आणि त्यानंतरच शूद्ध झालेले पाणी प्राशन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.