लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत तीन, चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रब्बी हंगामातील तूर, कपाशी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांना बसत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ही हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे. त्या खालोखाल गहू पिकाची पेरणी ही २१ हजार ७०२ हेक्टरवर झाली. यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. गत तीन, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, हळद, तूर आदी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येते. कीड नियंत्रणासाठी शेतकरी हे विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. सकाळच्या सुमारास धुके पडत असल्याने याचा फटकाही पिकांना बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाजविदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसामुळे कपाशीचे नुकसान होऊ नये म्हणून कपाशीची फुटलेले बोंडे त्वरित वेचणी करावी. वांगे, टोमॅटो पिकांचे रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाले असल्यास स्थलांतरित करावे.
ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने कीड नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या. मार्गदर्शनासाठी कृषी विभाग तत्पर आहे. - एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी