वाशिम: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ आॅगस्टपासून पीककर्ज वितरण बंद केले होते. वंचित शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत लोकमतने २२ आॅगस्टच्या अंकात ‘मध्यवर्ती बँंकेकडून जिल्ह्यात पीककर्ज वितरण बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बँक प्रशासनाशी संपर्क साधून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्याच्या सुचना २२ आॅगस्ट रोजीच दिल्या.पीककर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांची गती संथ असल्याने खरीप हंगामातील पिके काढणीवर येत असतानाही जिल्ह्यात केवळ ७७ टक्के पात्र शेतकºयांना पीककर्ज वितरण होऊ शकले. जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत पीककर्जासाठी पात्र ८७७९० शेतकºयांना ६३१ कोटी ३४ लाख ३० हजार रुपयांचे पीककर्ज वितरीत झाले, तर अद्यापही २५ हजार २४८ पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. त्यात अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेने १४ आॅगस्टपासून शेतकºयांना पीककर्ज वितरण बंद केले. प्रत्यक्षात या बँकेने १४ आॅगस्टपर्यंत त्यांच्याकडील पात्र असलेल्या ६८ हजार ६३७ शेतकºयांपैकी ५३ हजार ३२४ शेतकºयांना पीककर्ज वितरीत केले. तथापि, त्यांच्याकडील ११ हजार ३१३ शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकºयांची आता पीककर्जाअभावी पंचाईत झाली आहे. लोकमतने या संदर्भात ‘मध्यवर्ती बँंकेकडून जिल्ह्यात पीककर्ज वितरण बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच जिल्हा उपनिबंधकांनी मध्यवर्ती बँकेला पीककर्ज वितरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
पीककर्ज वितरणाबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठस्तरावर चर्चा करण्यात आली आहे. कोणताही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू नये म्हणून आवश्यक दखल घेऊन पुन्हा पीककर्ज वितरण करण्याच्या सुचना बँकेला देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.-रवि गडेकर,जिल्हा उपनिबंधक, वाशिम