मंगरुळपीर: मानोरा तालुक्यातील जामदरा गावातील ग्रामस्थांनी ३ मे रोजी दुपारी १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत यावर्षी सामूहिक शेतीचा संकल्प केला आहे. सामूहिक शेतीला शासनाने प्रथम प्राधान्य दिले असून, सामूहिक शेती करणे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. जामदरा हे गाव मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्याच्या सीमारेषेवर वसले असून, या गावातील संपूर्ण शेती ही कोरडवाहू असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामावरच अवलंबून राहावे लागते. याशिवाय या भागात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने शेतीचे नुकसान होणे ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना नियोजन करुन शेती करावी लागते. त्यामुळे शेती करीत असताना अल्प खर्चात भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठी येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन वेगवेगळे प्रयोग करावे लागते. त्याचाच एक भाग म्हणून निराशेकडून आशावादाकडे जाण्यासाठी पारंपरिक शेतीला फाटा देऊन येथील २५ शेतकऱ्यांनी १०० एकर जमिनीवर सामूहिक शेती करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीपासून, ते पिककाढणीपर्यत सामूहिक रित्या शेतीचे नियोजन करावयाचे आहे. यामध्ये २५ शेतकऱ्याचा एक गट तयार करण्यात आला असून, या गटाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी एक सल्लागार समीती गठीत करण्यात आली असून, या सल्लागार समिती अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत उपाध्यक्ष वाशिम जि प सदस्य गजानन अहमदाबादकर सचिव डॉ.नीलेश हेडा आहेत सामूहिक शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होत असून, सामूहिक शेती शेतकऱ्याच्या फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची गरज लक्षात घेऊन सामूहिक शेतीकडे वळावे, असे आवाहन माजी खासदार सावंत यानी केले. यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. जामदरा येथील शेतकऱ्यांनी गतवर्षी खरिपावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
जामदरावासीयांचा सामूहिक शेतीचा संकल्प
By admin | Published: May 04, 2017 1:16 AM