नांदुरा (जि. बुलडाणा) : नांदुरा तालुक्यात सामाजिक एकता आणि जातीय सलोखा नांदावा यासाठी, मामुलवाडी या गावात गेल्या चार वर्षांंपासून सामूहिक लक्ष्मीपूजनाची परंपरा राबविण्यात येत आहे. यावर्षी मामुलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ११ जोडप्यांच्या हस्ते सामूहिक लक्ष्मीपूजन करण्यात आले. सर्वधर्मिय नागरिकांची या अनोख्या दीपावलीला उपस्थिती होती, हे येथे उल्लेखनिय! मामुलवाडी येथे गेल्या चार वर्षापासून प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सामूहिक लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. या दीपोत्सवात गावातील सर्व धर्मांंचे नागरिक सहभागी होत असल्याने, तालुका आणि परिसरात मामुलवाडीतील दीपोत्सवाचे महत्व वाढत आहे. केवळ सामुहिक लक्ष्मीपूजनच नव्हे तर, गावातील गोरगरिबांना मिष्ठान्न आणि कपड्याचेही वितरण या दीपोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. यासाठी गावातील समस्त नागरिक परिश्रम घेतात. येथील नागरिक राजेश गांवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांने गावातील उपक्रमाची माहिती दिली. गावात जातीय सलोखा राहावा, सर्व धर्म समभावाचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी गेल्या चार वर्षांंपासून सामुहिक लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती लाभते.
मामुलवाडी येथे सामूहिक लक्ष्मीपूजन
By admin | Published: November 14, 2015 2:13 AM