अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह शेतजमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना निवेदन देण्यात आले.
नुकसानग्रस्त शेतकरी पंडित तुकाराम भेंडेकर, निंबाजी तुकाराम भेंडेकर व वामन किसन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शिवणी (द) व भडकुंभा, ता. मंगरूळपीर येथे ४ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे पिकासह शेतजमीन खरडून गेली. विहिरीमध्ये गाळ साचला. त्यामुळे गाव परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाबाबत त्वरित चौकशीचे आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आहे. अतिवृष्टीमुळे शिवणी शिवारातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१३ सालीसुद्धा विहिरी गाळल्या होत्या व पैसे मंजूर झालेले असताना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. याबाबतीत तात्काळ चौकशी व पंचनामे करण्याचे आदेश देऊन सर्व्हे करण्यात यावे व १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.