वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १५ एप्रिल रोजी वाशिम शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच संचारबंदीची कडक अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे त्यांच्यासोबत होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शहरातील पाटणी चौक परिसरातील बाजारपेठेची पाहणी केली. याठिकाणी काही दुकाने, आस्थापनाधारकांकडून कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यानंतर संबंधित दुकानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त ताकीद दिली. तसेच यापुढे कोणत्याही दुकानात अथवा आस्थापनेमध्ये गर्दी झाल्याचे दिसल्यास अथवा दुकानदार व ग्राहक यांच्याकडून मास्कचा वापर होत नसल्याचे आढळून आल्यास सदर दुकान पुढील आदेशापर्यंत सील करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व नगरपालिका प्रशासनाला दिल्या. तसेच परवानगी नसलेले कोणतेही दुकान, आस्थापना सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनाधारकावर कारवाई करून सदर आस्थापना सील करण्याच्या सूचना केल्या.
महात्मा फुले भाजीपाला मार्केट व गुरुवार बाजारची पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे शक्य नसल्याने तेथील भाजीपाला विक्रेत्यांना शहरात इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या. एकाच ठिकाणी जास्त भाजीपाला, फळे विक्रेत्यांना परवानगी न देता शहरातील विविध भागांमध्ये त्यांना भाजीपाला व फळे विक्रीसाठी जागा निश्चित करून द्यावी. जेणेकरून नागरिकांनाही आपल्या परिसरात भाजीपाला उपलब्ध होण्यास मदत होईल. नगरपालिकने यादृष्टीने तातडीने नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.