लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ५0 टक्के शाळांनीच सहभाग नोंदविल्याने कलचाचणी वांध्यात सापडली आहे. दरम्यान, शाळांनी अंगिकारलेल्या या धोरणाविरूद्ध अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे पत्र पाठवून तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. फेब्रुवारी/मार्च २0१८ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम प्रविष्ठ होणार्या सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी त्यांच्या शाळेत १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार होती. त्यानुसार, १0 फेब्रुवारीपर्यंत संबंधित सर्व शाळांनी ‘कल १८ डॉट एमएच-एसएससी डॉट एसी डॉट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, अमरावती विभागातील एकूण शाळांपैकी ५0 टक्केच शाळांनी या आदेशाचे पालन केले आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्ह्यातील नोंदणी न करणार्या माध्यमिक शाळांना सूचना देवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ अमरावती विभागीय मंडळास सादर करावा, अशा सूचना विभागीय सचिवांनी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कलचाचणीसंदर्भात अमरावती विभागीय सचिवांचे पत्र प्राप्त झाले असून जिल्ह्यातील कोणत्या शाळांनी कलचाचणी घेतली नाही अथवा कोणत्या शाळांनी १0 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी केली नाही, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. तसा सविस्तर अहवाल विभागीय सचिवांकडे लवकरच पाठविला जाईल.- डॉ. ज्ञानेश्वर नागरेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प., वाशिम