जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर मात करण्यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार आहे. दरम्यान, लसीकरण कार्यक्रम राबविताना येऊ शकणारे अडथळे शोधणे आणि त्यानुसार पुढील उपाययोजना करण्यासाठी ‘ड्राय रन’ हा उपक्रम घेण्यात आला. क्षेत्रीयस्तरावर ‘कोविन अॅप’ किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, लसीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी व अहवाल तयार करणे, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी असलेली आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ८ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालस, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलूबाजारच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात ‘ड्राय रन’ घेण्यात आला. या माध्यमातून लाभार्थींवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी शन्मुगराजण एस. यांनी भेट देऊन पाहणी केली.
.................
कोट :
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून जिल्ह्यातील तीन ठिकाणी शुक्रवारी ड्राय रन मोहीम राबविण्यात आली. प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधणे आणि त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली.
डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम