लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख घसरला असून, नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट झाली. सध्या जिल्ह्यातील १३०५ पैकी ११६० कोरोना बेड रिक्त असून, ऑक्सिजनवर १९ रुग्ण आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक ठरत आहे.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने गंभीर रुग्णांसाठी कोविड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविली होती. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा आलेख घसरल्याने सुदैवाने बेडही मोठ्या संख्येने रिकामे झाले. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट झाल्याचे दिसून येते. १३०५ पैकी ११६० बेड रिक्त असून, ऑक्सिजनवरील रुग्णांसह केवळ १४५ बेड वापरात आहेत. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंताही वाढली होती. सप्टेंबरमध्ये खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटींगवर राहण्याची वेळ आली होती. ऑक्सिजन व नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख प्रचंड खाली आल्याने आरोग्य विभागावरील ताणही कमी झाला. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी यापुढेही सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने बेड मोठ्या प्रमाणात रिकामे राहत आहेत. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम