पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे पालकांचे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शाळाबाह्य मोहिमेसाठी शालेय शिक्षण विभागासोबत सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास योजना, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांतील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. त्यासोबतच सरकारी, खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडीसेविका यांचीसुद्धा मदत घेतली जाणार आहे. या शाळाबाह्य मोहिमेसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. १० मार्चपर्यंत सदरचे सर्वेक्षण चालणार असून तालुक्यात सुरुवात करण्यात आली आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:41 AM