लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील मराठा समाजाने एकजूट दाखवून आरक्षणाच्या मुद्यावर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले, आंदोलने केली. त्याचे फलीत म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने आरक्षण बहाल केले. सवर्णांनाही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्याच धर्तीवर येत्या ४० दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे रविवार, २० जानेवारीला पार पडलेल्या आरक्षण आक्रोश महामेळाव्यात केले.धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी वाशिम येथे काटा-कोंडाळा रोडवरील खुल्या प्रांगणात सुमारे १५ हजार समाजबांधवांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात आक्रोश महामेळावा पार पडला. या कार्यक्रमास अनंतकुमार पाटील, युवा नेते गोपीचंद पडळकर, आमदार रामराव वडकुते, उत्तमराव जानकर, डॉ. शशिकांत तरंगे, भैयासाहेब बंडगर, शिवदास बिडगर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. महात्मे म्हणाले, की राज्यशासनाने गेल्या साडेचार वर्षांत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. आता केवळ ४० दिवसांचा अवधी उरला आहे. त्यात आरक्षणाच्या जल्लोषाचा पिवळा रंग उडवायची संधी नाही मिळाली तर निवडणूकीनंतरचा लाल गुलालही राज्यकर्त्यांना उधळू देणार नाही, असे ते म्हणाले. धनगर समाज भीक मागत नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात दिले आहे, तोच आरक्षणाचा हक्क मागत आहोत. त्यामुळे यापुढे हयगय झाल्यास धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलनाची धार अधिक तीव्र करेन. त्यासाठी समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या खास शैलीत शासनाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर समाजाला ७० वर्षांपासून आरक्षणासाठी झुलत ठेवले, त्याचप्रमाणे भाजपानेही भुमिका अंगिकारली तर समाज आता गप बसणार नाही. आरक्षण नाही मिळाले तर राज्यातील धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीने भाजपाला मत देवू नये. भाजपाच्या कुठल्याच सभेला हजेरी लावू नये, असे आवाहन पडळकर यांनी केले. जो राजकीय पक्ष धनगर समाजाला आमदार, खासदारकीची संधी देईन, त्याच्याच पाठीशी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत समाज उभा राहीन, असेही पडळकर यांनी यावेळी सांगतले. उपस्थित इतर मान्यवरांचीही याप्रसंगी समयोचित भाषणे झाली. आरक्षण आक्रोश महामेळाव्यास राज्यभरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी वाशिमचे नगरसेवक बाळू मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव मस्के, सरपंच बबनराव मिटकरी, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, विनोद मेरकर, डिगांबर खोरणे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नप्ते यांच्यासह जिल्हाभरातील समाजबांधवांनी पुढाकार घेतला.
धनगर आरक्षणासाठी समाजाची एकजूट महत्वाची - डॉ. विकास महात्मे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:49 PM