भरपाईसाठी शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना फायद्याची आहे, मात्र गत दोन वर्षांपासून पीक विमा कंपनी शेतकऱ्याची थट्टा करीत असून, काजळेश्वर येथील शेतकरी नितीन उपाध्ये यांना पीकविम्यापोटी केवळ ४९.२१ रुपये रक्कम मंजूर करण्याचा प्रताप कंपनीने केला आहे .
शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कवच मिळावे, त्यांना नुकसान भरपाईचा आधार व्हावा, म्हणून शासन प्रशासन पीकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करते. शेतकरीही या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो रुपये भरून पिकांना विम्याचे कवच देतात, तर नैसर्गिक आपत्तीने पीक नुकसान झाल्यानंतर प्रशासन आणि कंपनीच्या सूचनेनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून ७२ तासांच्या आत कंपनीला नुकसानाची माहिती देतात. गतवर्षी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यापैकी अनेकांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ मिळाला नाहीच, तर पीकविमा मंजूर करताना अनेक शेतकऱ्यांची क्रूरथट्टा कंपनीकडून केली जात आहे. असाच प्रकार काजळेश्वर येथील शेतकरी नितीन उपाध्ये यांच्याबाबत घडला असून, गतवर्षीच्या पीक नुकसानापोटी त्यांना केवळ केवळ ४९.२१ रुपये विमा मंजूर करण्यात आला आहे. तसा मेसेजेही त्यांना कंपनीकडून प्राप्त झाला आहे.
कोट: पीकविमा काढल्यानंतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास ७२ तासात कंपनीला कळविले जाते. आम्ही गतवर्षी पीकनुकसान झाल्यानंतर कपंनीला कळविले. त्यावर आता विमा मंजूर झाला असून, हजारो रुपये भरले असताना आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना कंपनीने केवळ ४९.२१ रुपये विम्यापोटी मंजूर केले आहेत. ही शेतकऱ्यांची क्रूरथट्टा नव्हे, तर काय आहे.
- नितीन पा. ऊपाध्ये,
शेतकरी काजळेश्वर