- संतोष वानखडे वाशिम : संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील १.४२ लाख हेक्टर पिकांवरील नुकसानापोटी मिळणारी भरपाई लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर अधिक असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. नवीन निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असून, पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. शासन निर्णयात जून ते ऑगस्ट महिन्यातील नुकसानभरपाईचा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात १२९७.७२ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानापोटी ५८५६ शेतकऱ्यांसाठी निधी मिळाला असून, ऑगस्ट महिन्यातील पीक नुकसानभरपाईसाठी लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.