शेलूबाजार: नजीकच्या पेडगाव येथील शेतकरी बंडू वैद्य आणि बाळू वैद्य यांना त्यांच्या शेतातून वहिवाटीसाठी इतर शेतकऱ्यांना रस्ता सोडण्यासाठी मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी दबाव टाकत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी उपरोक्त शेतकऱ्यांनी केली आहे.
पेडगाव येथील बंडू भिकाजी वैद्य आणि बाळू भिकाजी वैद्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की, बंडू वैद्य आणि बाळू वैद्य हे पेडगाव येथे राहतात. याच गावात गट क्र. १३१/३ मध्ये त्यांच्या मालकीची व वहिवाटीतील ६.२१ हे.आर. शेतजमीन आहे. ही जमीन त्यांनी १९८६ मध्ये विकत घेतली. तेव्हापासून ते ही जमीन त्यांच्या वहिवाटीत आहे. या शेतजमिनीत कधीच व कोणासाठीही रस्ता नव्हता; परंतु बंडू प्रल्हाद इंगोले आणि अरुण शामराव देशमुख व इतर काहींनी कलम ५ मामलतदार कोर्ट अॅक्टखाली खटला दाखल केला. तो ३० एप्रिल २०२१ रोजी खारीज झाला. त्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर यांच्याकडे अपील केले. त्यानुसार ३० जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली; परंतु याच दरम्यान तहसीलदारांचे आदेश दाखविल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी बंडू वैद्य आणि बाळू वैद्य यांना खडसावत ताबडतोब रस्ता खुला करण्यास सांगितले. त्यामुळे उपरोक्त दोन्ही शेतकरी भयग्रस्त झाले असून, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.