कोठा ग्रामपंचायत अंतर्गत २०१८-१९ मध्ये नरेगाअंतर्गत ११ कलमी कार्यक्रम गावात राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत बोगस शेततळे दाखवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आहे. कुक्कुटपालनाच्या नावाखाली हजारो रुपये हडपण्यात आले. रोहयो अंतर्गत खोदलेले शेततळे अंदाजपत्रकानुसार नाही, तसेच दाखविलेला जागेवरही काही शेततळे नाही, तर काही तर तक्रार दिल्यानंतर खोदण्यात आले. रोहयोच्या मस्टरवर खऱ्या मजुरांच्या स्वाक्षऱ्या न घेता एकाच व्यक्तीने स्वाक्षऱ्या केल्याचे दिसून येते. तसेच मयत व्यक्तीच्या नावे पैसे काढल्याचे सामाजिक अंकेक्षण पथकाने आपला अहवालात नमूद केले आहे, शाळेजवळील नालीचे काम बोगस असून, त्याची एमबी न करताच ८० हजार रुपये काढण्यात आले. गजानन परसराम अवचार यांचा शेतात रोहयोंतर्गत विहीर दाखवून परस्पर मस्टर टाकून ८१ हजार रुपये काढण्यात आले आहेत. याबाबत लाभार्थी गजानन अवचार यांना कुठली माहिती नाही. वृक्षारोपण कार्यक्रमातही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे, मात्र अनेकवेळा निवेदने देऊनही आजवर दोषींवर कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर आठवडाभरात कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा गावकऱ्यांसोबत जि.प. कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मालेगाव तालुका उपाध्यक्ष वैभव अवचार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर निवेदनातून दिला आहे.
कोठा ग्रामपंचायतीत रोहयो अंतर्गत गैरप्रकाराची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:33 AM