सुनील काकडे, वाशिम: तालुक्यातील अवैध सावकारीच्या व्यवहारासंबंधी प्राप्त तक्रारीची दखल घेत सहकार व पोलिस विभागाच्या पथकाने दोन व्यक्तींची झाडाझडती घेवून स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदी खत, कोरे बाॅन्ड आणि धनादेश जप्त केले. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधितांवर धडक कारवाई होणार असल्याचे सुतोवाच संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले.
वाशिममध्ये वास्तव्यास असलेले गजानन कव्हर आणि दीपक गाडे या दोन इसमांविरोधात अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली होती. त्याची दखल घेत संबंधितांची झाडाझडती घेतली असता काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, जमिनींचे खरेदी खत, कोरे बाँड, धनादेश आदी दस्तावेज आढळून आले. ते ताब्यात घेवून सावकारी कायद्यांतील तरतुदीनुसार पुढील चाैकशीस प्रारंभ करण्यात आला आहे.
सहायक निबंधक (प्रशासन) आर.आर. सावंत, एम.डी. कच्छवे यांनी पथक प्रमुख म्हणून कामकाज पाहिले; तर रिसोडचे सहायक निबंधक अक्षय गुट्टे, सहकार अधिकारी पी.एन. झळके, बी.बी. मोरे, मालेगावचे सहकार अधिकारी के.जी. चव्हाण, मुख्य लिपीक पी.आर. वाडेकर, एस.पी. रोडगे, एम.जे. भेंडेकर, वरिष्ठ लिपीक एस.जी. गादेकर, कनिष्ठ लिपीक बी.ए. इंगळे, मदतनीस व्ही.ए. इंगोले यांनी त्यांना सहकार्य केले.
गजानन कव्हर आणि दीपक गाडे या दोन इसमांविरोधात अवैध सावकारीची तक्रार दाखल झाली होती. त्याअनुषंगाने कार्यवाही करून काही दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. चाैकशी सुरू असून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक, वाशिम