वाशिम : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. सदर मदत निधीचे वाटप २६ जानेवारी २0१५ पूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ मदत निधी वाटप आढावा बैठकीत संबंधित अधिकार्यांना दिल्या.१२ जानेवारी रोजी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, दिनकर काळे, राजेंद्र पारनाईक, तहसीलदार आशीष बिजवल, जनार्धन विधाते, श्रीकांत उंबरकर, बी.डी. अरखराव, ए. एम. कुंभार, ए. पी. पाटील उपस्थित होते.विभागीय आयुक्त राजूरकर यांनी उपस्थित अधिकार्यांना सूचना करताना सांगितले की, शेतकर्यांचे बँक खाते नंबर मिळवून मदत निधीचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदारांनी प्राधान्याने करावी. प्रत्येक तालुक्याला पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या निधीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्यात.यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी जिल्ह्यात केल्या जात असलेल्या मदत निधी वाटपाची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्याला सध्या ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. हा निधी मागणी केलेल्या एकूण निधीच्या ४0 टक्के इतका असून, या निधीचे सर्व तहसील कार्यालयांना वाटप करण्यात आले आहे. तहसीलला वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये वाशिम तहसील कार्यालयाला ११ कोटी, मालेगावला ९ कोटी ५0 लाख, रिसोडला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीरला ८ कोटी ५३ लाख, मानोराला ८ कोटी व कारंजाला १0 कोटी निधी देण्यात आला आहे. तहसील स्तरावर ८0 ते ८५ टक्के शेतकर्यांच्या बँक खात्याचे नंबर मिळवण्यात आले असून, उर्वरित बँक खाते नंबर दोन दिवसात प्राप्त होऊन जातील. मदत वाटपातील लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत व तलाठी स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांवर १३ जानेवारी २0१५ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर १४ जानेवारी २0१५ पासून मदत निधी वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यत जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
२६ जानेवारीपर्यंत मदत वाटप पूर्ण करा
By admin | Published: January 13, 2015 1:05 AM