वाशिम - पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. हा मुद्दा समोर करून काँग्रेससह अन्य काही राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्यास वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहीठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळपासून बंद असलेली व्यावसायिक प्रतिष्ठाने दुपारी १२ वाजतानंतर खुली झाली. बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.वाशिम जिल्ह्यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, पिरीपा आदी राजकीय पक्षांनी बंद पुकारून जिल्ह्यातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सोमवारी सकाळपासून दुपारी १२ वाजतापर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर मात्र बहुतांश दुकाने सुरू करण्यात आली. यादरम्यान पेट्रोलपंप, शाळा-महाविद्यालयांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. एस.टी.सह अन्य वाहतूकीवर मात्र या बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. दिग्गज पदाधिकारी उतरले रस्त्यावर!सर्वसामान्य जनतेला असह्य होणा-या महागाईच्या विरोधात आवाज उठवून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी बंद पुकारला. यादरम्यान काँग्रेसमधील दिग्गज पदाधिकारी चक्क रस्त्यावर उतरल्याचा अनुभव लोकांनी घेतला. त्यात प्रामुख्याने रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अमित झनक यांच्यासह आजी-माजी पदाधिका-यांचा समावेश होता. यावेळी प्रत्येक शहरात फिरून ध्वनिक्षेपकाव्दारे व्यावसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले.
‘भारत बंद’ला वाशिम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 5:40 PM