देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात कोरोनाचा आलेख कमालीचा खाली आल्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंदच्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. शाळेचे वर्ग बंद असल्याने साहजिकच संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयदेखील बंदच आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्कामधून संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय या बाबींना वगळून अन्य शुल्क आकारण्यात यावे, असा सूर पालकांमधून उमटत आहे. परंतु, पालकांची मागणी धुडकावून लावत अनेक शाळांनी गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्व शैक्षणिक शुल्क भरावे, असे संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविण्याचा सपाटा लावला आहे. शैक्षणिक शुल्काचा भरणा न केल्यास ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या चाचणी, परीक्षेला बसण्यास विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असाही इशारा काही शाळांनी दिल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. ऑनलाईन पद्धतीच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंदर्भात शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी; मात्र संगणक, प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे शुल्क आकारू नये असा सूर पालकांमधून उमटत आहे.
००००
कोट बॉक्स
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्यासाठी वर्ग बंद असल्याने संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय बंदच आहेत. त्यामुळे या तीन बाबी वगळून अन्य शैक्षणिक शुल्काची आकारणी करावी. याचा भुर्दंड पालकांना बसणार नाही.
- विशाल डुकरे
पालक, वाशिम
०००
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी, शाळा चालविण्यासाठी शैक्षणिक शुल्क वसूल करणे आवश्यक आहे. दुसरीकडे कोरोनामुळे शाळा बंद असल्याने संगणक, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आदी बाबींसाठी शुल्क न आकारता ट्यूशन फी आकारली तर पालकांनादेखील दिलासा मिळेल.
- विजय मनवर,
पालक, वाशिम
0000
पालकांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कातूनच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्च करावा लागतो. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक शुल्काचा भरणा करण्याबाबत शाळा प्रशासनाला सहकार्य करावे.
- संतोष गडेकर
जिल्हाध्यक्ष मेस्टा संघटना
०००००
विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना शैक्षणिक शुल्कातूनच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्च भागवावा लागतो. त्यामुळे पालकांनी टप्प्याटप्प्याने शैक्षणिक शुल्काचा भरणा करणे अपेक्षित आहे. संगणक, ग्रंथालय बंद असल्याने त्या शुल्काचा समावेश एकूण शुल्कामध्ये करण्यात येऊ नये, अशा सूचना शाळांना दिल्या जातील.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम