लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण भागातील जनतेला सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकांना बिघाडाचे ग्रहण लागले आहे. दिवसाला ८ संगणक आणि प्रिंटर नादुरुस्त होत असल्याने ग्रामीण भागांतील शेतकरी, विद्यार्थ्यांसह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले, नाहकरत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला आदी १३ प्रमाणपत्रासाठी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना अर्जदारांना लांब रांगेत उभे राहणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे मिळवू शकतात. ही सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत; परंतु आता या सेवा केंद्रातील संगणक जुने झाल्याने त्यात वारंवार बिघाड होत असून, दिवसाला ८ संगणक नादुरुस्त होत असल्याची माहिती या यंत्रणनेशी निगडीत घटकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.
५० संगणक संच निकामीचजिल्ह्यातील ४९१ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी दरदिवशी ८ केंद्रांतील संगणकात बिघाड होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे कठीण होत आहे. त्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील ५० संगणक संच निकामीच झाल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली असून, हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे.
१० वर्षांपासून नवी खरेदीच नाहीआपले सरकार सेवा केंद्र योजना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीत या योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांसाठी २०११ मध्ये संगणक संचांची खरेदी करण्यात आली. आता दहा वर्षे उलटत आले असून, याच संगणक संचांच्याआधारे आपले सरकार सेवा केंद्रांचे काम सुरू असून, नवे संच खरेदीच करण्यात आलेले नाहीत.
आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे संगणक १० वर्षे जुने असून, त्यात आता वारंवार बिघाड होत असल्याने जनतेला सुरळीत सेवा देण्यात अडचणीत येत आहेत.- शेखर हिरगुडेआपले सरकार सेवा केंद्रचालक, वाशिम