लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया २३ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविली आहे. गावातील शांतता आणि सलोखा अबाधित ठेवण्यासाठी ज्येष्ठ मंडळीच्या सल्ल्याने परस्पर सामंजस्यातून गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला आहे.सर्वांचा आवडता उत्सव असलेल्या गणेशोत्सवाला १३ सप्टेंबरपासून हर्षोल्हासात प्रारंभ करण्यात आला. या उत्सवासाठी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत ६० ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली. यात २३ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना ग्रामस्थांनी राबविली आहे. गतवर्षी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया १७ गावांत एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली होती. यंदा त्यामध्ये ६ गावांची भर पडली आहे. यंदा ही संकल्पना राबविणाºया गावांमध्ये शिरसाळा, शेलगाव, इंगोले, पार्डी तिखे, दापुरी कालवे, मसला पेन, मुठ्ठा, येवता, दुधाळा, ढोरखेडा, वाघळूद, शेलगाव बगाडे, गोवर्धना, केनवड, केशवनगर, नावली, मिर्झापूर, जोगेश्वरी, कुकसा, चिंचांबापेन, बेलखेडा, पेनबोरी, मांगुळ झनक व भेरा आदि गावांचा समावेश आहे. गणेशोत्सव शांततामय मार्गाने साजरा करण्याचा निर्णय उपरोक्त गावांनी घेतला असून, गावातील ज्येष्ठ मंडळीच्या सल्ल्यानुसार युवकांनीच यासाठी पुढाकार घेत पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
शिरपूर पोलिसांच्या हद्दीत २३ गावांत ’एक गाव, एक गणपती’ संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 3:19 PM