स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाइल अॅप’द्वारे ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८नुसार उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि लागू केलेल्या पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते; परंतु ग्रामीण भागात मोबाइल इंटरनेटला पुरेशा प्रमाणात गती नसणे यासह तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या बाबींची माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवार ऑनलाइन खर्च सादर करण्याच्या पद्धतीने पुरते गोंधळात सापडले आहेत.
................
बॉक्स :
उमेदवारांपुढे निर्माण झाल्या अडचणी
ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलेले अनेक उमेदवार तुलनेने कमी शिकलेले आहेत. अनेकांना अॅण्ड्राॅइड मोबाइलसुद्धा व्यवस्थित हाताळता येत नाही. अशा स्थितीत निवडणूक झालेला खर्च ‘ट्रू व्होटर अॅप’व्दारे किंवा अन्य स्वरूपात ऑनलाइन सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत.
................
असा सादर करावा लागतो ऑनलाइन खर्च
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८नुसार उमेदवारांना निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा हा खर्च ‘ट्रू व्होटर अॅप’व्दारे किंवा अन्य स्वरूपात मात केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत.
....................
खर्च सादर करण्यास मोबाइल रेंजचा अडथळा
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींमधून निवडणूक लढलेले अनेक उमेदवार युवा असून, त्यांना ऑनलाइन प्रक्रिया कशी पार पाडायची, याची जाण आहे. असे असले तरी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक खर्च सादर करताना मोबाइल रेंजचा प्रमुख अडथळा जाणवत असल्याचे बोलले जात आहे.
...................
दोन उमेदवारांच्या प्रतिक्रिया
१८ जानेवारीला निवडणूक पार पडली. झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करण्याची तयारी आहे; मात्र ऑनलाइन पद्धत जाचक ठरत आहे. याऐवजी निवडणूक विभागाने इतर पर्याय सुचविल्यास योग्य होईल.
- देवराव बनसोड, येडशी
..................
ग्रामीण भागात मोबाइलला आधीच पुरेशी रेंज मिळत नाही. अशात निवडणुकीचा खर्च ‘ट्रू व्होटर अॅप’ किंवा अन्य स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
- दत्ता भिकाजी वारेकर, वारा जहाँगीर
.................
निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती
१५२
निवडून आलेले उमेदवार
१२३३