जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकरी उपोषणाला बसले होते. या उपोषाणाची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी याकरिता उपोषणकर्त्यांनी अनोख्या प्रकारे आंदोलनाची दिशा ठरविली होती. यामध्ये मायबाप सरकार दखल घेत नसल्याचा दाखला देत केशदान आंदोलन, गुढीपाडव्याला उपोषणमंडपी गुढी उभारून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची प्रतिज्ञा केली होती.
यादरम्यान खासदार भावना गवळी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, वाशिम यांच्यासोबत चर्चा केली व त्यानुसार उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ ॲड. श्रीकृष्ण राठोड, रवींद्र पवार, जगदीश राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, वाशिम आणि उपविभागीय अधिकारी, कारंजा यांच्यासमवेत भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागणीला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही जाहीर पाठिंबा उपोषणस्थळी येऊन दिलेला होता. खा. भावना गवळी यांनी जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, वाशिम, ॲड. श्रीकृष्ण राठोड, रवींद्र पवार आणि जगदीश राठोड यांच्यासमवेत बैठक घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली असता जिल्हा अधीक्षक यांना अद्ययावत दस्तऐवजांच्या आधारेच मोजणी करून उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा, असे निर्देश दिले. भावनाताई गवळी यांनी वाईगौळ येथे उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना याबाबत सविस्तर सांगितले आणि उपोषण सोडवून आरोग्याची काळजी घेण्याबाबत विनंती केली. खा. भावनाताई गवळी आणि माजी आ. प्रकाश डहाके यांनी शेवटपर्यंत उपोषणकर्त्यांच्या सोबत उभे राहून लढा उभारू असे शब्द दिल्याने, त्यांच्या विनंतीला मान देत खा. भावना गवळी यांच्या हस्ते लिंबू पाणी देत उपोषण सोडविले. शिवसेना तालुका प्रमुख रवी पाटील पवार यांनी उपोषणकर्ते व प्रशासन आणि खा. भावनाताई गवळी यांच्यामध्ये प्रारंभापासून तर उपोषणाची सांगता होईपर्यंत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी परिश्रम घेतले.